पिंपरी, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दिव्यांग भवन फाउंडेशन येथे प्रॉस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय सहाय्यक उपकरणे दुरुस्ती व मूल्यांकन शिबिराला लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दिनांक २५ ते २७ जुलै दरम्यान सुरू असलेल्या या शिबिराच्या दुसऱ्या दिवशी एकूण २८ लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १४ लाभार्थ्यांच्या प्रॉस्थेसिस आणि ऑर्थोसिस उपकरणांची दुरुस्ती करण्यात आली, तर उर्वरित १४ लाभार्थ्यांनी नव्या उपकरणांची मागणी नोंदवली. काही उपकरणांची तत्काळ दुरुस्तीही जागीच करण्यात आली. या सुविधांमुळे समाधान व्यक्त करत लाभार्थ्यांनी संपूर्ण टीमचे मनःपूर्वक कौतुक केले.
शिबिर रविवार, दिनांक २७ जुलैपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार असल्याची माहिती कार्यक्रम व्यवस्थापक दर्शना फडतरे यांनी दिली.
या उपक्रमात प्रॉस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स विभागातील तज्ज्ञांबरोबरच दिव्यांग भवनचे केअर गिव्हर्स, सुरक्षा रक्षक, व हाउसकीपिंग कर्मचारी यांनीही सक्रिय सहभाग नोंदवत शिबिर यशस्वी करण्यात मोलाचा वाटा उचलला.
“सहाय्यक उपकरणे दुरुस्ती ही दिव्यांगांची गरज ओळखून महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि D.B.F.चे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम सुरू केला आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. दिव्यांग भवन हे दिव्यांग नागरिकांसाठी वन स्टॉप सोल्युशन होण्यासाठीची वाटचाल सुरू आहे.” – परेश गांधी,(मुख्य कार्यकारी अधिकारी दिव्यांग भवन फाउंडेशन)