मुंबई ,दि.१० जुलै २०२५- महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग ठरलेले नाट्य व सांस्कृतिक कार्यक्रम दर शनिवारी, रविवारी तसेच विशेष दिवशी मोठ्या प्रमाणावर आयोजिले जातात. या कार्यक्रमांना रसिक आणि कलावंत दोघांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. मात्र, शासकीय किंवा राजकीय कार्यक्रम अचानक जाहीर झाल्यास आधीपासून नियोजित सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले जातात. त्यामुळे संबंधित कलावंतांचे आर्थिक नुकसान होते आणि प्रेक्षकही नाराज होतात.
कलावंतांचे हे प्रश्न विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार अमित गोरखे यांनी ठळकपणे मांडले. कार्यक्रम रद्द झाल्यास कलावंतांवर होणारा आर्थिक व मानसिक परिणाम लक्षात घेता, शासनाने यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी त्यांची ठाम मागणी होती.
यावेळी त्यांनी काही महत्त्वाच्या मागण्याही अधिवेशनात मांडल्या. त्यामध्ये ‘राजर्षी शाहू महाराज सन्मान योजना’ अंतर्गत लाभार्थी कलाकारांची संख्या १०० वरून ५०० पर्यंत वाढवावी, तसेच म्हाडाच्या घरांमध्ये कलाकारांसाठी असलेला २ टक्के कोटा वाढवून १० टक्क्यांपर्यंत करावा, अशी विनंती करण्यात आली.
आमदार गोरखे यांनी या सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन योग्य निर्णय मिळवण्याचे आश्वासन दिले आहे.