पिंपरी, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील एका शिक्षकाने सातवीच्या वर्गातील १३ वर्षीय विद्यार्थिनी व तिच्या मैत्रिणींशी अश्लील वर्तन केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
ही धक्कादायक घटना ११ ते १९ जुलै २०२५ या कालावधीत निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. आरोपी शिक्षकाने केवळ अश्लील चाळेच केले नाहीत, तर शाळेतील वॉशरूममध्ये डोकावून पाहत महिलांच्या लज्जा भंग होईल असे वर्तन केल्याचीही तक्रार आहे.
ही बाब उघडकीस आली कारण, महापालिकेच्या वतीने शाळांमध्ये “गुड टच- बॅड टच” आकलन शिक्षण देण्यासाठी महिला समुपदेशक नेमण्यात आले आहेत. समुपदेशक महिलांनी प्रशिक्षण दिले असता,विद्यार्थिनींनी पालकांना त्याबाबत अवगत केले . या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पालकांनी मुख्याध्यापकांकडे त्याबाबत तक्रार केली. त्यानंतर पोलीस आयुक्तांच्या सूचनेवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
याप्रकरणी निगडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७४, ७८, ११५(२), ‘पॉक्सो’ कायद्याचे कलम ७, ८, ९(एफ), १२ आणि अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन हिरे करत आहेत.
दरम्यान, महापालिकेच्या शाळांमध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून बसविण्यात आलेले काही सीसीटीव्ही कॅमेरा बंद स्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, या प्रकरणाची उशिरा दखल घेत महापालिकेच्या शिक्षण विभागाने कारवाईला सुरुवात केली आहे. संबंधित शिक्षकावर प्रशासकीय कारवाईची प्रक्रिया सुरू असून, मुख्याध्यापकांकडून अहवाल मागवण्यात आला आहे. अहवालानंतर शिक्षकाचे सेवानिलंबन करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण मोरे यांनी दिली.