पुणे, राज्याच्या काही भागांमध्ये हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुढील तीन ते चार तासांत रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून, पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यांमध्ये वादळांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, सुरक्षित स्थळी थांबावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच स्थानिक प्रशासन सतर्क असून, संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याची माहितीही मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.