पिंपरी, दि.१२ जुलै२०२५: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संजय निवृत्ती इंदलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड अध्यासी अधिकारी शशिकांत शृंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत पार पडली. संपूर्ण निवडणूक बिनविरोध झाली असून सर्व संचालक मंडळाने परस्पर सहकार्याचे उदाहरण घालून दिले.
या निवडीत उपाध्यक्ष पदी राजेंद्र कांगुडे, मानद सचिव पदी सुभाष सूर्यवंशी तर खजिनदार पदी संतोष गिड्डे यांचीही बिनविरोध निवड झाली.
पतसंस्थेची सदस्यसंख्या सुमारे ९०० असून वार्षिक आर्थिक उलाढाल जवळपास २०० कोटी रुपयांपर्यंत आहे. संस्थेने आतापर्यंत ७५ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले असून ३० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. चालू आर्थिक वर्षात संस्थेने १० टक्के लाभांश वितरित केला आहे, जो गेल्या पाच वर्षांतील उच्चांकी लाभांश आहे.
नवनियुक्त अध्यक्ष संजय इंदलकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “सभासद हित आणि संस्थेच्या प्रगतीसाठी संचालक मंडळाच्या सहकार्याने कार्य करणार आहोत. ही जबाबदारी सन्मानाने पार पाडू.”
या प्रसंगी प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष सचिन डिंबळे, पिंपरी चिंचवड अध्यक्ष संजय येणारे, नेते प्रकाश गायकवाड, अरुण दंडवते, माजी अध्यक्ष शिवाजी दौंडकर, सुरेखा मोरे, महिला आघाडी प्रमुख रुपाली कड, ज्योती तापकीर, सुरेखा गेंगजे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नवीन पदाधिकाऱ्यांनी सर्व शिक्षक, पदाधिकारी व उपस्थितांचे मनापासून आभार मानले.