पिंपरी, पिंपरी चिंचवड महापालिकेतील तब्बल ४७७६ पदे रिक्त असून, त्यामुळे शहरातील नागरी सेवा अडचणीत आल्याचे चित्र आहे. यावर तातडीने उपाययोजना करत रिक्त पदांची भरती करावी, तसेच स्थानिक तरुणांना प्राधान्य द्यावे, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. धम्मराज साळवे यांनी केली आहे.
या संदर्भातील निवेदन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे व सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर यांना सादर करण्यात आले. अधिकाऱ्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेत लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
रिक्त पदांमुळे अडचणी
महापालिकेच्या एकूण ११,५६० मंजूर पदांपैकी सध्या ४,७७६ पदे रिक्त आहेत. यामुळे आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, अतिक्रमण निर्मूलन अशा नागरी सेवांवर मोठा परिणाम होत आहे. शहराचा विस्तार १८१ चौ. कि.मी. पर्यंत वाढला असून, लोकसंख्या ३० लाखांच्या पुढे गेली आहे. यामध्ये नव्याने प्रस्तावित ७ गावांचा समावेश झाल्यास प्रशासनावरचा भार अधिकच वाढणार आहे.
अॅड. साळवे यांच्या ठोस मागण्या:
सुधारित आकृतिबंधास शासनमान्यता तातडीने मिळवावी
ऑगस्ट २०२३ मध्ये राज्य शासनाकडे सादर केलेला आकृतिबंध अद्याप मंजूर न झाल्यामुळे अनेक विभागांवर अतिरिक्त ताण आहे.
४,७७६ रिक्त पदांची तातडीने भरती करावी
विशेषतः नागरी सेवा देणाऱ्या विभागांमध्ये भरतीस गती द्यावी.
विभागीय प्राधान्यक्रमानुसार भरती प्रक्रियेला गती द्यावी
जेणेकरून कामकाजात परिणामकारकता वाढेल.
अनुकंपा तत्वावरील रखडलेल्या भरती तातडीने पूर्ण कराव्यात
५,३२५ नवीन पदनिर्मितीसाठी शासनमान्यता मिळवावी
यामुळे एकूण पदसंख्या १६,८३८ होईल.
स्थानिक तरुणांना महापालिकेच्या भरतीत प्राधान्य द्यावे
प्रशासन व सामाजिक गरजांची जाण असलेल्या युवकांकडून कार्यक्षम सेवा मिळू शकते.
अॅड. साळवे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “महापालिकेतील कार्यक्षमतेत वाढ होण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरली गेली पाहिजेत. स्थानिक तरुणांना संधी दिल्यास बेरोजगारीचा प्रश्नही कमी करता येईल आणि प्रशासनात नवचैतन्य निर्माण होईल.”
या गंभीर बाबीकडे शासन व प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.