सार्वजनिक शिक्षण धोक्यात, पिंपरीत आंदोलनाची तयारी
पिंपरी, दि. ११ जुलै :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहा इंग्रजी माध्यमांच्या शाळा पुढील पाच वर्षांसाठी ‘आकांक्षा फाउंडेशन’ या खासगी संस्थेकडे देण्याच्या निर्णयाला आम आदमी पार्टीने तीव्र विरोध दर्शवला आहे. या निर्णयामुळे सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेचे खासगीकरण होत असून, गरजू व मध्यमवर्गीय कुटुंबांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होईल, असा इशारा ‘आप’चे शहराध्यक्ष रवीराज काळे यांनी दिला.
या उपक्रमासाठी महापालिकेच्या निधीतून तब्बल ₹४० कोटी ५३ लाख ७५ हजार खर्च केला जाणार आहे. मात्र, या प्रक्रियेत फक्त एका संस्थेचा अर्ज प्राप्त होऊन त्यालाच थेट काम देण्यात आले, ही बाब संशयास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
रवीराज काळे यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जांभळे यांना निवेदन देत खालील प्रमुख मागण्या मांडल्या:
• शाळांच्या खासगीकरणाच्या निर्णयाला तात्काळ स्थगिती द्यावी.
• संपूर्ण प्रक्रियेची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.
• महापालिकेच्या निधीतूनच शासकीय शाळांमध्ये गुणवत्ता सुधारणा कराव्यात.
शाळांचे खासगीकरण हे शिक्षणाच्या व्यापारीकरणाचे पाऊल असून, सार्वजनिक शिक्षण हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे, असे मत काळे यांनी व्यक्त केले. महापालिकेच्या शाळा म्हणजे अनेक गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे एकमेव साधन आहे. त्यामुळे सरकारने हे खासगीकरण थांबवावे, अन्यथा आम आदमी पार्टी संघर्ष करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी यल्लाप्पा वालदोर, चंद्रमणी जावळे, कुणाल वक्ते, अजय सिंग, स्वप्नील जेवळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.