पिंपरी,पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे शहर अभियंता श्री. मकरंद निकम यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्याने सदर पद सध्या रिक्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर शहर अभियंता पदावर नगरनियोजनाचा सखोल अनुभव असलेला शासकीय अधिकारी नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना संदीप वाघेरे म्हणाले की, शहर अभियंता हे पद महापालिकेच्या एकूण विकास प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचे असून नगररचना, पायाभूत सुविधा, रस्ते, जलनिस्सारण, बांधकाम परवाने तसेच दीर्घकालीन विकास आराखडा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांशी थेट संबंधित आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून शहरीकरणाचा वेगही मोठ्या प्रमाणात आहे. अशा परिस्थितीत शहर अभियंता पदावर नगरनियोजनातील सखोल अनुभव असलेला, शासकीय सेवेत कार्यरत असलेला सक्षम अधिकारी नेमण्यात येणे अत्यावश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दैनंदिन प्रशासकीय गरजांबरोबरच राज्य शासनाच्या धोरणांशी सुसंगत नियोजन व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय सेवेतून आलेला अधिकारी अधिक उपयुक्त ठरेल, असे वाघेरे यांनी स्पष्ट केले.
शहर अभियंत्यावर रस्ते, पूल, पाणीपुरवठा, मलनिस्सारण व्यवस्था, सार्वजनिक इमारती, स्ट्रीट लाईटिंग व ड्रेनेज सिस्टीम यांसारख्या पायाभूत सुविधांची आखणी, रचना, अंमलबजावणी आणि देखभाल करण्याची मोठी जबाबदारी असते. तसेच नवीन विकास प्रकल्प आणि विद्यमान पायाभूत सुविधांच्या सुधारणा, कंत्राटदारांशी समन्वय, आर्थिक अंदाजपत्रकात काम पूर्ण करणे, विविध विभागांना तांत्रिक सहाय्य पुरवणे आणि जटिल अभियांत्रिकी समस्यांवर उपाय शोधणे ही कामेही शहर अभियंत्याच्या अखत्यारित येतात.
शहराच्या भविष्यातील विकासासाठी झोनिंग, भूमी वापराचा अभ्यास, कायदेशीर व नियामक तरतुदींचे पालन, तसेच महापौर व पदाधिकाऱ्यांना प्रकल्पांच्या प्रगतीबाबत नियमित अहवाल सादर करणे आवश्यक असते. यासोबतच अभियांत्रिकी व सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रभावी पर्यवेक्षण आणि मूल्यांकन करण्याची जबाबदारी अनुभवी शासकीय अधिकारी अधिक सक्षमपणे पार पाडू शकतो, असेही वाघेरे यांनी नमूद केले.
त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वांगीण, नियोजनबद्ध आणि पारदर्शक विकासाच्या दृष्टीने शहर अभियंता या महत्त्वाच्या पदावर राज्य शासनाच्या नगरविकास विभागातील किंवा तत्सम अनुभवी शासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, अशी आग्रही मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे.













