पिंपरी, पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतील पिंपरी गाव प्रभाग क्रमांक 21 संवेदनशील प्रभाग म्हणून जाहीर करावा अशी मागणी प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे यांच्या सह डब्बू आसवानी, निकिता कदम, प्रियांका कुदळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
यासंदर्भात वाघेरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस आयुक्त यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपल्या कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक 21 मध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक तणाव कायदा व सुव्यवस्था या दृष्टीने संवेदनशील घटना घडत आहेत. प्रभागातील मतदारांना विविध प्रकारची प्रलोभने दाखवली जात आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना धमकावण्याचे प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी काळात प्रभागात अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रभागातील लोकसंख्येची घनता,विविध सामाजिक घटक तसेच यापूर्वी घडलेल्या घटनांचा विचार करता प्रभाग क्रमांक 21 पिंपरी गाव हा संवेदनशील प्रभाग म्हणून घोषित करावा अशी मागणी संदीप वाघेरे यांनी केली आहे.













