चिंचवड, टाटा मोटर्स कंपनीच्या युनियन कार्यालयात सुरू असलेल्या बैठकीदरम्यान एका कर्मचाऱ्यावर युनियन प्रतिनिधींनी मारहाण करून अंगावर कचरा फेकल्याची घटना उघडकीस आली. यात कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना शुक्रवारी (१८ जुलै) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास टाटा मोटर्स कंपनीच्या एचआर ऑफिस शेजारील युनियन ऑफिसमध्ये घडली.
या प्रकरणी विनोद विठ्ठल खुरंगळे (४०) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेंद्र पाटील, विक्रम वर्षे, चेतन बालवाडकर आणि रितेश पिसाळ या चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व आरोपी टाटा मोटर्समध्ये नोकरी करतात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा मोटर्स कंपनीच्या युनियन ऑफिसमध्ये युनियन प्रतिनिधींची बैठक सुरू असताना, बैठकीतील आरोपींपैकी एकाने ‘युनियनमध्ये खूप कचरा झाला आहे, तो साफ केला पाहिजे’ असे म्हटले. त्यानंतर बाहेरची कचऱ्याने भरलेली डस्टबिन आणून विनोद खुरंगळे यांच्या अंगावर टाकली आणि त्यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच, इतर दोन आरोपींनी विनोद यांना हाताने मारहाण केली आणि एकाने पाण्याची स्टीलची बॉटल डोक्याच्या उजव्या बाजूला मारून जखमी केले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.