पिंपरी,अखिल सलमानी समाज विकास संस्थेतर्फे पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांच्या जयंतीनिमित्त (जश्ने ईद-ए-मिलाद-उन-नबी) पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या सोहळ्यास काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) शहर उपाध्यक्ष धम्मराज साळवे, सामाजिक कार्यकर्ते कासीम शेख यांच्यासह विविध पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, सर्व जुलूस कमिटीचे अध्यक्ष आणि मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांचा कार्यक्रमादरम्यान सत्कार करण्यात आला. उपस्थित बांधवांसाठी मोठ्या प्रमाणावर तबरुख व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
ईद-ए-मिलाद-उन-नबीचे महत्त्व
पैगंबर मोहम्मद साहेबांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने साजरा केला जाणारा हा उत्सव मानवता, समानता, सत्य, शांतता आणि बंधुभावाचा संदेश देणारा मानला जातो. सलोखा, ऐक्य आणि सद्भावना वाढवण्याचा संदेश या उत्सवातून समाजापर्यंत पोहोचवला जातो.
कार्यक्रमात संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सिकंदर शेख, सेक्रेटरी समद शेख, उप-सेक्रेटरी साजिद शेख, तसेच विभागीय अध्यक्ष रिजवान शेख (भोसरी), असलम शेख (हिंजवडी), इकराम शेख (डांगे चौक), हैदर अली शेख (गुरु पिंपळे), जलालुद्दीन शेख (पिंपरी), शकील शेख (निगडी), महमूद शेख (नेहरू नगर), आलम शेख (कालेवाडी) यांच्यासह सर्व पदाधिकारी, सभासद, दुकानदार व सलमानी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
अध्यक्ष नशीम हकीम सलमानी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “ईद-ए-मिलाद-उन-नबीचा खरा अर्थ म्हणजे समाजात ऐक्य, बंधुता, प्रेम आणि शांततेचा संदेश रुजवणे. पैगंबरांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे समानता, शिक्षण, नीतिमत्ता आणि सेवाभाव यांचा अवलंब करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे आवश्यक आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष नशीम हकीम सलमानी यांनी केले.













