मोशी, हुंड्याच्या मागणीसाठी मानसिक आणि शारीरिक छळ करून एका विवाहितेला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना १७ जुलै रोजी बोऱ्हाडेवस्ती, मोशी येथे घडली.
किरण आशिष धामोदर असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी संजय हरिभाऊ दोड (५८, जवुळखेड बुद्रुक, ता. अकोट, अकोला) यांनी फिर्याद दिली आहे. आशिष दिपक धामोदर (३२, बोऱ्हाडेवस्ती, मोशी; मूळ गावकावसा, ता. अकोट, जिल्हा अकोला), सुनंदा दिपक धामोदर (५०, गावकावसा, ता. अकोट, जिल्हा अकोला) आणि दिपक तुकाराम धामोदर (६०, गावकावसा, ता. अकोट, जिल्हा अकोला) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पती आशिष याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादींची मयत मुलगी किरण धामोदर हिला लग्नात हुंडा दिला नाही म्हणून वेळोवेळी पैशाची मागणी केली. त्यांनी फिर्यादींकडून थोडे थोडे करून एकूण ५ लाख रुपये घेतले. त्यानंतरही पुन्हा आणखी पैशाची आणि मोटारसायकलची मागणी करून तिला वेळोवेळी मारहाण, शिवीगाळ आणि धमकी देऊन तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. या छळामुळे किरण यांनी आत्महत्या केली. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.