सांगवी, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगवी प्रभाग क्रमांक ३२ मध्ये राजकारणाची गणिते झपाट्याने बदलू लागली आहेत. विद्यमान नगरसेवक संतोष कांबळे यांच्या पत्नी तृप्ती कांबळे यांच्या उमेदवारीमुळे एकतर्फी वाटणारी लढत, आता अपक्ष उमेदवार डॉ. प्रज्ञा गायकवाड यांच्या दमदार एंट्रीमुळे थेट अटीतटीच्या संघर्षात रूपांतरित झाली आहे.
सांगवी प्रभाग हा आमदार शंकर जगताप यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र याच बालेकिल्ल्यात आता गावकी-भावकीचे राजकारण चांगलेच पेटले आहे. सत्ताधारी गटाची ताकद, विद्यमान नगरसेवकाचा अनुभव आणि यंत्रणा असली तरी स्थानिक पातळीवर नाराजी, अंतर्गत मतभेद आणि नव्या नेतृत्वाची अपेक्षा उफाळून येताना दिसत आहे.
विद्यमान नगरसेवक संतोष कांबळे यांची पत्नी म्हणून तृप्ती कांबळे यांना सत्तेचा अनुभव, ओळख आणि संघटनात्मक पाठबळ मिळत असले तरी “वारसा राजकारण” हा मुद्दा विरोधकांकडून ठळकपणे उपस्थित केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर डॉ. प्रज्ञा गायकवाड यांची अपक्ष उमेदवारी चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.
डॉ. प्रज्ञा गायकवाड या शिक्षित, सामाजिक कार्यात सक्रिय आणि नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवार म्हणून पुढे येत आहेत. विशेष म्हणजे त्यांचे बंधू धम्मरत्न गायकवाड, हे आरपीआय पिंपरी-चिंचवड आठवले गटाचे युवक शहराध्यक्ष असून, त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. युवक, आंबेडकरी चळवळ, सामाजिक कार्यकर्ते आणि असंतुष्ट मतदारांचा ओघ डॉ. गायकवाड यांच्या बाजूने झुकत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.
“नगरसेवक पती” ही ओळख जरी तृप्ती कांबळे यांच्याकडे असली, तरी जनसंपर्क, मैदानातील ताकद आणि कार्यकर्त्यांची फळी ही डॉ. प्रज्ञा गायकवाड यांची मोठी जमेची बाजू मानली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत सत्ताधारी गट विरुद्ध जनआधारित अपक्ष उमेदवार असा थेट सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
अपक्ष एंट्रीमुळे प्रभागातील पारंपरिक मतदानाचे गणित बिघडले असून, शेवटच्या टप्प्यातील प्रचारात आरोप-प्रत्यारोप, शक्तिप्रदर्शन आणि गुप्त भेटी वाढण्याची शक्यता आहे.
आता एकच प्रश्न सांगवीत घुमतोय—
सत्तेची पकड टिकणार, की जनसंपर्काची ताकद इतिहास घडवणार?
प्रभाग ३२ चा निकाल हा केवळ नगरसेवकाचा नाही, तर संपूर्ण सांगवीच्या राजकारणाची दिशा ठरवणारा ठरणार आहे.













