निगडी, जुन्या भांडणाच्या कारणावरून दहा जणांच्या टोळक्याने एका व्यक्तीवर कोयत्याने वार करत खुनी हल्ला केला. घरांवर दगडफेक आणि वाहनांची तोडफोड केली. ही घटना शनिवारी (१२ जुलै) रात्री ओटास्किम, निगडी येथे घडली. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
साहिल गुलाब शेख (२२, निगडी), शंतनू सुनील म्हसुडगे (२४, रावेत), अविनाश भाऊ आव्हाड (२६, किवळे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह युवराज अडागळे आणि चिराग उर्फ लल्ला चंडालिया यांच्यासह इतर पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी २३ वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवराज अडागळे याचे फिर्यादी महिलेचे पती आणि सोहेल जाधव यांच्यासोबत पूर्वी भांडण झाले होते. त्या रागातून आरोपींनी फिर्यादी यांचे वडील विजय ढोणे यांना ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर कोयत्याने वार केले. फिर्यादी यांच्या घरावर दगड मारले. एकालाही जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत हवेत कोयते नाचवून दहशत निर्माण केली. फिर्यादी यांच्या मैत्रिणीच्या घरावर दगडे मारून तिच्या दुचाकीसह अन्य चार दुचाकींची तोडफोड करत नुकसान केले.