पिंपरी: गुजर स्नेहवर्धिनी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सांगवी गुजर बोर्डिंग येथे झालेल्या कार्यक्रमात रक्तदात्यांच्या भरीव सहभागामुळे या शिबिरात एकूण ५० रक्त पिशव्यांचे (युनिट्स) यशस्वी संकलन करण्यात आले. या अमूल्य रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवीन जीवन मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
डॉ. डी. वाय. पाटील ब्लड सेंटर, पिंपरी (पुणे) यांच्या तज्ञ वैद्यकीय टीमचे मोलाचे सहकार्य आणि गुजर स्नेहवर्धिनीच्या स्वयंसेवकांनी घेतलेल्या अथक परिश्रमांमुळे हे शिबिर अत्यंत सुनियोजित आणि यशस्वीरीत्या पार पडले.
गुजर स्नेहवर्धिनीचे अध्यक्ष अजय गुजर यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की, समाजासाठी दिलेले हे योगदान अत्यंत प्रेरणादायी आहे. रक्तदात्यांचा निःस्वार्थी सहभाग आणि स्वयंसेवकांचे अखंड प्रयत्न शिबिराच्या यशाचे गमक ठरले.
शिबिराच्या नियोजन, समन्वय आणि यशस्वीतेसाठी ज्या मान्यवरांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले, त्यांचे गुजर स्नेहवर्धिनी तर्फे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी प्रमोद चौधरी, मनिष पाटील, भूषण गुजर (वाडी-शिरपूर), सामर्थ्य पाटील, रुपेश पाटील, सचिन शहा, महेंद्र महाजन, भुषण पाटील, तुषार पाटील, प्रदीप पाटील, जयवंत पाटील, राजू पाटील, संदीप पाटील,गोपाळ चौधरी, शाम चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिरासाठी समाज बांधवांचा सक्रिय सहभाग महत्त्वपूर्ण ठरला.
शिबिरामध्ये थेट आणि अप्रत्यक्षरित्या योगदान देणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे, स्वयंसेवकांचे आणि मान्यवरांचे गुजर स्नेहवर्धिनीच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले. या उपक्रमाने सामाजिक बांधिलकीचे एक उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.













