रहाटणी दि. 6 एप्रिल : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त वॉर्ड क्र. २७, रहाटणी येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून मनपा शाळा क्र. ५५ (मुले व मुली) येथील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना जेवणाच्या प्लेटचे वाटप करण्यात आले.

हा उपक्रम स्थानिक नगरसेविका सौ. सविता बाळकृष्ण खुळे यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात पार पडला. वाढदिवस साधेपणाने आणि समाजोपयोगी पद्धतीने साजरा करत विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडेल असा उपक्रम राबविण्यात आल्याने परिसरात कौतुक होत आहे.

यावेळी बोलताना नगरसेविका सविता खुळे म्हणाल्या की, आमदार शंकरभाऊ जगताप हे नेहमीच जनसेवेला प्राधान्य देतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड क्रमांक २७ मध्ये विविध विकासकामे वेगाने सुरू आहेत. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सतत जनसेवा घडत राहावी या हेतूने विद्यार्थ्यांमध्ये आनंद वाटत हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला नगरसेवक बाबासाहेब (बाबा) त्रिभुवन, नगरसेविका अर्चना विनोद तापकीर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला.











