राहाटणी, रहाटणी येथे जुन्या भांडणातून एका तरुणावर चाकू हल्ला करण्यात आला. ही घटना रविवारी (२० जुलै) रात्री राहाटणी येथे घडली.
या प्रकरणी कुंदन राजेंद्र वाघ (३३, नखातेवस्ती, राहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे. सौरभ (राहाटणी) आणि त्याचा एक साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र सचिन रमेश सगर (३५, नखातेवस्ती, राहाटणी) हे कौतिक हॉटेलसमोरून घरी जात असताना, फिर्यादींच्या ओळखीचा आरोपी त्यांच्या पाठीमागून एका साथीदारासह आला. आरोपीला पूर्वी भांडण करताना फिर्यादीने पकडले होते, त्या रागातून त्याने फिर्यादीला थांबवून शिवीगाळ केली आणि हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादी आणि त्यांचा मित्र समजावून सांगत असतानाही आरोपी आणि त्याच्या साथीदाराने त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. मारहाण करताना आरोपीने त्याच्या पॅन्टच्या खिशातील छोटा चाकू काढून फिर्यादीच्या उजव्या हाताच्या पंजावर वार करून त्यांना जखमी केले. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.