संत तुकारामनगर, तुकाराम नगर येथील डी. वाय. पाटील सिनियर कॉलेज येथे कॉलेजच्या फ्रेशर पार्टीवरून झालेल्या वादामुळे एका विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. ही घटना सोमवारी (२८ जुलै) सकाळी ११:३० वाजता घडली.
तन्मय अविनाश कांबळे (१८, कासारवाडी) यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिषेक गिरी, अल्फान निसार पठाण, शिवराज तलवारे, सोहल शेख, बिराज विश्वकर्मा, यश दीपक पवार, आदिनाथ सोमनाथ गायकवाड आणि इतर अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी अभिषेक गिरी, अल्फान निसार पठाण, शिवराज तलवारे, सोहेल शेख, यश दीपक पवार, आदिनाथ सोमनाथ गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र अनिश पिंगळे नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये गेले असता, अभिषेक गिरी आणि अल्फान निसार पठाण यांनी अनिशसोबत फ्रेशर पार्टीला जाण्यावरून वाद घातला आणि त्याला शिवीगाळ केली. सकाळी साडेअकरा वाजता कॉलेज सुटल्यानंतर डी. वाय. पाटील सिनियर कॉलेजच्या गेटवर त्यांच्या ओळखीचे यश दीपक पवार, आदिनाथ सोमनाथ गायकवाड, सोहेल मुनीर सोहेल शेख, शिवराज तलवारे, निहाल, बिराज विश्वकर्मा आणि इतर मुलांनी फिर्यादीला बोलावून घेतले. त्यापैकी निहाल याने फिर्यादीच्या अंगावर त्याच्या ताब्यातील काळ्या रंगाची ॲक्टिवा मोटारसायकल घातली. सोहेल मुनीर याने फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या हातात असलेला लोखंडी कोयता फिर्यादीच्या डोक्यात आणि डाव्या हाताला मारून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीच्या जुन्या घराशेजारी राहणारा शिवराज तलवारे यानेही त्याच्या ताब्यातील मोटारसायकल फिर्यादीच्या अंगावर घातली. त्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या हातात असलेला लोखंडी कोयता फिर्यादीच्या पाठीवर मारून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर “आम्ही डी. वाय. पाटीलचे भाई आहोत” असे ओरडत, हातात असलेले कोयते हवेत फिरवत दहशत निर्माण केली आणि तेथून निघून गेले. संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत.