थेरगाव, जुना राग मनात धरून एका टोळक्याने घरात घुसून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (२१ डिसेंबर) दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास शिवशंभो कॉलनी, थेरगाव येथे घडली.

याबाबत विजय नाना लष्कर (४२, शिवशंभो कॉलनी, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तुषार पांडुरंग साठे (२४, क्षितीज कॉलनी, जगताप डेअरी, वाकड), साई लाड (१९, जय मल्हार कॉलनी, थेरगाव) आणि राहुल गिरिशचंद्र अग्रवाल (३०, थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी आपल्या घरी असताना तिन्ही आरोपींनी तिथे येऊन “तू लय शहाणा झालास काय, काल कुठे पळून गेला होतास” असे म्हणत वाद घातला. आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यावर, तोंडावर आणि डोळ्यावर बुक्क्यांनी जोरात मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीचे दोन दात पडले आहेत. वाकड पोलीस तपास करत आहेत.













