मुंबई, कारवाई करताना स्वतःच्या खाजगी मोबाईल फोनचा वापर करून फोटो किंवा व्हिडिओ काढू नयेत, असे आदेश महाराष्ट्रातील वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक महाराष्ट्राचे अप्पर पोलिस महासंचालक (वाहतूक) प्रशांत साबळे यांनी जारी केले आहे.
२ जुलै रोजी मुंबई येथे परिवहन मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली वाहतूक संबंधित अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत वाहतूक कारवाईच्या वेळेस अधिकारी/अंमलदार स्वतःच्या मोबाईलचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले. अशा प्रकारच्या खाजगी मोबाईलमधून फोटो काढल्यास त्याचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच माहितीचा सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होतो, असे बैठकीत नमूद करण्यात आले.
त्यामुळे यापुढे केवळ विभागीय अधिकृत मोबाइल अथवा सिस्टीमद्वारे अधिकृत फोटोंची नोंद केली जावी, असे स्पष्ट निर्देश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
तसेच, यासंदर्भातील आदेशाची कडक अंमलबजावणी व्हावी आणि याचे पालन होत आहे का, याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.