पिंपरी, प्रभाग क्रमांक ९ गांधीनगर–खराळवाडी (अनुसूचित जाती राखीव) येथील समविचारी तसेच आगामी सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये रस असलेल्या सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांची तातडीची बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भीमसृष्टी, पिंपरी चौक येथे मोठ्या उत्साहात पार पडली. बैठकीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर प्रभागातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत आणि निवडणूक तयारीबाबत सविस्तर चर्चा झाली.
गेल्या १८ वर्षांत गांधीनगर परिसराला स्थानिक नगरसेवक मिळालेला नसल्याने, या वेळी अनुसूचित जाती राखीव प्रवर्गातून स्थानिक उमेदवाराला संधी मिळणे आवश्यक असल्याचे मत बहुसंख्य उपस्थितांनी व्यक्त केले. स्थानिक नेतृत्वाला पुन्हा पुढे येण्याची संधी मिळाल्याने इच्छुकांनी भावनिक मनोगत मांडत प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याची भूमिका व्यक्त केली. सर्वच पक्षातील इच्छुकांनी आपल्या-आपल्या पक्षांकडून स्थानिक उमेदवारालाच तिकीट मिळावे, याबाबत एकमुखी मागणी करण्याचे ठरवले.
प्रभागातील पाणीटंचाई, शौचालयांची कमतरता, दुरावस्थित रस्ते, दिवाबत्तीतील त्रुटी, बेरोजगारी, व्यसनाधीनता, गुन्हेगारी, विधवा आणि निराधार योजनांचे अपुरे लाभ यांसह प्रलंबित नागरी प्रश्नांवर सखोल चिंतन झाले. स्थानिक उमेदवार निवडून आल्यास हे प्रश्न प्राधान्याने मार्गी लागतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
बैठकीत सर्वानुमते एक महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आला. कोणत्याही राजकीय पक्षाने बाहेरील उमेदवाराला तिकीट दिल्यास त्याला मतदान न करण्याचा निर्णय एकमुखी घेण्यात आला. प्रभागातील एकता टिकवून ठेवून स्थानिक उमेदवारालाच संपूर्ण पाठिंबा देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
निवडणुकीत कोणतेही आमिष, प्रलोभन, धमकी किंवा मतदारांना फितूर करण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत आणि अशा प्रयत्नांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली जाईल, याची स्पष्ट सूचना देण्यात आली. स्वच्छ, पारदर्शक आणि प्रामाणिक निवडणूक प्रक्रिया राखण्याचा संकल्पही उपस्थितांनी केला.
बैठकीस अॅड. बी. के. कांबळे, काँग्रेसचे अॅड. उमेश खंदारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे अॅड. धम्मराज साळवे, RPI चे दिलीप साळवे, कष्टकरी नेते बाबा कांबळे, RPI चे अजीज शेख, प्रल्हाद कांबळे, भाजपा तर्फे अॅड. दत्ता झुळूक, वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र साळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत बोचकुरे, अजय शेरखाने, दीपक म्हेत्रे, गिरीश साबळे आणि निलेश काळे हे इच्छुक उमेदवार उपस्थित होते. तर लक्ष्मण कांबळे, हिराचंद जाधव, गणेश साळुंखे, धम्मा आचलखांब, सम्राट गायकवाड, राजन गुंजाळ, मनोज गजभार आणि रविभाऊ कांबळे यांसारख्या ज्येष्ठ मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
या बैठकीमुळे प्रभागातील एकजूट दृढ झाली असून, स्थानिक नेतृत्वाबद्दलची नागरिकांची अपेक्षा आणि आत्मविश्वास अधिक वाढला आहे.














