जुनी सांगवी,”रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा खरा वारसदार पक्ष आहे. हा पक्ष सर्वसामान्य, कष्टकरी आणि वंचितांच्या कष्टावर उभा राहिलेला आहे. आम्ही भाजपसोबत गेलो नाही, तर भाजप आमच्या सोबत आला आहे! आम्ही बाबासाहेबांची चळवळ सोडलेली नाही. समाजातील प्रत्येक सामान्य माणसाच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी रिपाई नेहमी लढत राहील. आज महायुती मजबूत आहे आणि ती अशीच भक्कम राहील,” असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.
जुनी सांगवी येथे डॉ. धम्मरत्न गायकवाड यांच्या “जन युवक कार्यालय” (जनसंपर्क कार्यालय) उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
सांगवी परिसरात झालेला हा सोहळा उत्साहात पार पडला, उपस्थित कार्यकर्त्यांनी “जय भीम” आणि “रिपाई झिंदाबाद”च्या घोषणा देत परिसर दुमदुमवला.
या प्रसंगी डॉ. धम्मरत्न गायकवाड यांनी सांगितले की, “जन युवक कार्यालयाच्या माध्यमातून युवकांना रोजगार, उद्योजकता आणि सरकारी योजनांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत रिपाईचे विचार आणि काम पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.”
कार्यक्रमास आमदार शंकर जगताप, रिपाई महिला आघाडीच्या अध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे, अध्यक्ष कुणाल व्हावळकर, माजी महापौर उषा ढोरे, माजी नगरसेवक परशुराम वाडेकर,प्रशांत शितोळे, हर्षल ढोरे, संतोष कांबळे, सूर्यकांत वाघमारे, बाळासाहेब भागवत, निवेदक दीपक मस्के आदी मान्यवर उपस्थित होते.
सांगवी व दापोडी परिसरातील रिपाई (आठवले गट) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रामदास आठवले यांचे स्वागत करताना परिसरात जल्लोषमय वातावरण निर्माण केले.
या उद्घाटन सोहळ्यामुळे सांगवी परिसरात नवचैतन्य निर्माण झाले असून, रिपाई युवक आघाडीच्या माध्यमातून सामाजिक कार्याला नवा वेग मिळणार आहे.













