रहाटणी : रहाटणी येथील तमारा हाऊसिंग सोसायटीमधील नागरिकांनी बिल्डर आणि विकासकांविरोधात सुरू केलेल्या शांततापूर्ण साखळी उपोषणाची दखल घेत चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. यासाठी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी पाठपुरावा केला होता.

या बैठकीस पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाचे सहशहर अभियंता सुनील भगवानी, कार्यकारी अभियंता विजय सोनवणे, जयवंत रोकडे, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश अलाहट, कनिष्ठ अभियंता प्रताप मोरे, सोसायटीचे पदाधिकारी, सभासद तसेच बिल्डर प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान सोसायटीमधील विविध प्रलंबित समस्या, मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या तक्रारींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे स्पष्ट निर्देश बिल्डरला देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसेच बिल्डरकडून सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले असून काही कामांना तत्काळ सुरुवात करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

याबाबत नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य बाबासाहेब ज्ञानोबा त्रिभुवन यांनी नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि मूलभूत सुविधांसाठी कायम कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले.











