अग्निशमन दलाला तातडीने पाचारण; खिडकीवाटे मुलींना बाहेर काढत मोठी दुर्घटना टळली
पिंपळे सौदागर : गणेशम सोसायटी फेस-२ येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटला शुक्रवारी (दि. १८) अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीच्या वेळी सदनिकेत दोन अल्पवयीन मुली अडकल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक नाना काटे यांनी प्रसंगावधान राखत तातडीने अग्निशमन व वैद्यकीय यंत्रणेशी संपर्क साधला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे बचावकार्याला वेग आला.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. सदनिकेत अडकलेल्या दोन्ही मुलींना बाहेर काढण्यासाठी जवानांनी विशेष कौशल्याचा वापर करत खिडकीच्या माध्यमातून त्यांची सुखरूप सुटका केली. त्यानंतर आग नियंत्रणात आणण्यात आली. या कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली.

सुटका करण्यात आलेल्या दोन्ही मुलींना खबरदारी म्हणून वैद्यकीय तपासणी व उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी नाना काटे यांनी कुटुंबीयांना धीर देत वैद्यकीय मदतीसाठी आवश्यक समन्वय साधला.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आगीमुळे फ्लॅटमधील घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, त्याबाबत अग्निशमन विभागाकडून तपास सुरू आहे.

नाना काटे यांच्या तातडीच्या समन्वयासह अग्निशमन दलाच्या तत्पर बचावकार्यातून दोन अल्पवयीन मुली सुरक्षित बाहेर पडल्या. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.












