निघोजे, मैत्रीणीला मेसेज केल्याच्या किरकोळ कारणावरून एका तरुणावर चाकूने हल्ला केला. हल्ल्यात तरुणाच्या डाव्या हाताला आठ टाके पडले आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (१८ जुलै) सायंकाळी खेड तालुक्यातील निघोजे गावाच्या हद्दीतील अँटोलिन लाइटिंग या कंपनीत घडली.
या प्रकरणी शरद जगन्नाथ लूचारे (४९) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शैलेश वसंत हिवाळे (२४) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शैलेश हिवाळे याने फिर्यादी शरद लूचारे यांना ‘तू रागिणीला का मेसेज केलास’ असे विचारले. यावरून त्यांच्या तोंडावर चापट मारत ‘तुला जीवे मारतो’ अशी धमकी दिली. आरोपीने कमरेत लपवून ठेवलेला चाकू काढून शरद यांच्या डाव्या छातीवर वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र शरद हे बाजूला सरकल्याने चाकू त्यांच्या डाव्या हाताच्या दंडाला लागला आणि त्यात त्यांना आठ टाके पडले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.













