पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील भुयारी मार्ग आणि उड्डाणपुलांच्या भिंतींवर छत्रपती शिवाजी महाराज आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर लावण्यात आल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्याविरुद्ध आज संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.

या पोस्टरमध्ये शिवरायांच्या सिंहासनासमोर मुख्यमंत्री फडणवीस अभिवादन करताना दिसत असून त्यात “देवा भाऊ” असा उल्लेख केल्याने संताप व्यक्त होत आहे. हे पोस्टर भुयारी मार्ग व उड्डाणपुलांच्या भिंतीवर अशा ठिकाणी लावले आहेत की वाहनांच्या चिखलामुळे शिवराय आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचा अपमान होत असल्याचे भापकरांनी म्हटले आहे.
“या प्रकारामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि घटनात्मक पदावरील मुख्यमंत्री यांच्या प्रतिमेची विटंबना होत आहे. काही राजकीय स्वार्थासाठी असे पोस्टर लावण्यात आले असावेत. तातडीने हे पोस्टर काढून टाकावेत, तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासून जबाबदारांना शोधून कठोर कारवाई करावी,” अशी मागणी भापकरांनी आपल्या निवेदनात केली आहे.
मराठा क्रांती मोर्चा निवेदन
या पोष्टर प्रकरणावर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची विटंबना होत असून काही ठिकाणी पोस्टरवर गुटखा खाऊन पिचकार्या मारल्याचे निदर्शनास आले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

याविरुद्ध तातडीने कारवाई करण्याबाबतचे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने वतीने महापालिका आयुक्तांना देण्यात आला आहे.
या पोष्टर घटनेमुळे शहरात चर्चेला उधाण आले असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे.













