पिंपरी : पिंपरीत सामाजिक उपक्रमांमध्ये कार्यरत असलेले ऋषिकेश वाघेरे (पाटील) यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी मागणी केल्याचे समोर आले आहे. या मागणीमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात हालचाली सुरू झाल्या आहेत.
वाघेरे कुटुंबाची सार्वजनिक जीवनातील पार्श्वभूमी लक्षात घेता, ही मागणी महत्त्वाची मानली जात आहे. आजोबा दिवंगत भिकू वाघेरे यांनी महापौर म्हणून कार्य केले होते. त्यानंतर संजोग वाघेरे यांनी देखील महापौर म्हणून महापालिकेतील जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. तसेच उषा वाघेरे यांनी नगरसेविका आणि स्थायी समिती सभापती म्हणून कामकाज केले आहे. त्यांचाच वारसा पुढे चालवत ऋषिकेश वाघेरे हे गेल्या काही वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम, युवक संघटन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी असल्याची माहिती आहे. कोविड-१९ काळात त्यांनी राबवलेल्या मदतकार्याचा उल्लेखही स्थानिक पातळीवर केला जात आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर संजोग वाघेरे, उषा वाघेरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. तर उषा वाघेरे यांनी भाजपाकडून महापालिकेची निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्यांना अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले होते. याच पार्श्वभूमीवर ऋषिकेश वाघेरे यांच्याकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी मागणी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या मागणीवर अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नसून याबाबत भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
त्यामुळे वाघेरे कुटुंबातील तिसऱ्या पिढीचा औपचारिक राजकारणात प्रवेश होतो का, याबाबत स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. पुढील निर्णयानंतर चित्र स्पष्ट होणार आहे.













