पिंपरी, सुमारे १५ लाख १२ हजार रुपये किमतीच्या १४२.२३० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज प्रकरणात पिंपरी-चिंचवड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला नियमित जामीन मंजूर केला आहे. बचाव पक्षाचे वकील अॅड. राजेश राजपुरोहित यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विविध न्यायनिर्णयांचा आधार घेत केलेल्या युक्तिवादानंतर हा निर्णय झाला.
या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात सी.आर. क्रमांक ४१/२०२६ अन्वये अमली पदार्थ आणि मनःप्रभावी पदार्थ अधिनियमाच्या (NDPS Act) कलम ८(क), २२(क) आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. न्यायालयीन आदेशानुसार, कथित जप्त एमडी ड्रग्जची किंमत १५ लाख १२ हजार ३०० रुपये आहे. आरोपीला २४ फेब्रुवारी २०२६ रोजी राजस्थानमधील बिलारा येथे अटक करण्यात आली होती.
जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी बचाव पक्षाने अर्जदाराकडून थेट अमली पदार्थ जप्त करण्यात आले नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच, आरोपीचा कथित गुन्ह्याशी संबंध जोडण्यासाठी सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे जामिनाची मागणी करण्यात आली.
दरम्यान, अभियोजन पक्षाने जामिनाला विरोध करत आरोपीचा कथित अमली पदार्थ पुरवठा साखळीतील सहभाग, आर्थिक व्यवहार आणि पूर्वीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा उल्लेख केला.
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या एक किंवा अधिक जामीनदारांच्या हमीवर नियमित जामीन मंजूर केला. न्यायालयाने आदेशात नमूद केलेल्या अटींचे पालन करण्याचे निर्देशही दिले.
या प्रकरणात आरोपीतर्फे अॅड. राजेश राजपुरोहित यांच्यासह अॅड. प्रीती धुळे, अॅड. महेश मार्कड, अॅड. रोहित घोलप, तनया जगदाळे, प्रणिल चौधरी आणि विपुल पांडे यांनी बाजू मांडली.
#mefedron #adrajeshrajpurohit #pimpricourt #pimprichinchwadcrimrenews #crimenews twincitynews











