पिंपरी,भारतीय जनता पक्षाच्या आगामी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज प्रक्रियेला वेग आला असून, मोरवाडी येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उत्साहात पार पडल्या. करिश्मा बारणे, सिद्धेश्वर बारणे, शालिनी गुजर आणि गणेश गुजर यांनी भाजपचे तिकीट मिळविण्यासाठी पक्षश्रेष्ठींसमोर आपली भूमिका मांडत, निवडणूक जिंकण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.
या मुलाखतीदरम्यान आमदार शंकर जगताप, उमा खापरे, आमदार अमित गोरखे, आमदार महेश लांडगे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. प्रत्येक इच्छुक उमेदवाराने पक्षसंघटनात्मक कार्य, स्थानिक प्रश्नांची जाण आणि विकासात्मक दृष्टीकोन याबाबत सविस्तर मांडणी केली.
थेरगाव प्रभाग क्रमांक २४ मधून इच्छुक उमेदवार असलेल्या करिश्मा बारणे यांनी आपल्या सामाजिक कार्याचा तसेच जनाधाराचा सविस्तर अहवाल (जनाधार कार्य अहवाल) सादर केला. गेल्या काही वर्षांत नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने केलेल्या कामांचा आढावा देत, प्रभागातील मूलभूत सुविधा, महिला-सक्षमीकरण, युवकांसाठी संधी आणि नागरी समस्या सोडविण्याबाबतची स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. पक्षाने संधी दिल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भाजपकडून इच्छुक उमेदवारांची ही मुलाखत प्रक्रिया पारदर्शक आणि संघटनात्मक बळकटी दर्शविणारी असल्याचे चित्र दिसून आले. कार्यक्षम, जनतेशी थेट नाते असलेल्या आणि विकासाभिमुख उमेदवारांवर पक्षाचा भर असल्याचे संकेत या प्रक्रियेतून मिळत आहेत. आगामी निवडणुकीत भाजप अधिक ताकदीने मैदानात उतरण्याची तयारी करत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.













