पिंपरी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या उमेदवारी अर्जांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून छाननी करण्यात आली. या छाननीअंती माजी विरोधीपक्ष नेते राहुल भोसले, माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर, सारिका मासुळकर आणि सिद्धार्थ बनसोडे यांच्या उमेदवारी अर्जांना वैध ठरविण्यात आले आहे.

अर्ज वैध ठरल्यानंतर प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रचाराला अधिक वेग येणार असल्याचे चित्र आहे. प्रभाग क्रमांक ९ च्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे उमेदवारांनी सांगितले. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सेवा, स्वच्छता तसेच नागरी मूलभूत सुविधांवर भर देत नागरिकांशी थेट संवाद साधून प्रचार राबविण्यात येणार आहे.

जनतेच्या विश्वासावर निवडणूक लढवत विकासाची नवी दिशा देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. आगामी काळात नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत प्रभावी आणि नियोजनबद्ध प्रचार करण्यात येणार असल्याचेही उमेदवारांनी स्पष्ट केले.

दरम्यान, प्रभाग ९-अ मधून सिद्धार्थ बनसोडे, प्रभाग ९-ब मधून डॉ. वैशाली घोडेकर, प्रभाग ९-क मधून सारिका मासुळकर आणि प्रभाग ९-ड मधून माजी विरोधी पक्षनेते राहुल भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढवत आहेत.













