पुणे : आयटी क्षेत्रात नोकरीचे आमिष दाखवून विद्यार्थी आणि तरुणांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या कथित प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते ओंकार तुपे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणातील पीडित विद्यार्थ्यांना घेऊन त्यांनी थेट पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेत न्यायाची मागणी केली होती. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने चौकशीचे आदेश दिले.

पीडित विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, काही आयटी कन्सल्टन्सी आणि प्रशिक्षण संस्थांनी नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी देण्याचे आश्वासन देत मोठ्या प्रमाणात रक्कम घेतली. मात्र अनेकांना नोकरी मिळाली नाही, तर काहींना काम करूनही पगार मिळाला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कथित घोटाळ्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्यावर मानसिक ताणही निर्माण झाला आहे.

सामाजिक कार्यकर्ते ओंकार तुपे यांनी पीडितांकडून तक्रारी आणि कागदपत्रे गोळा करून संपूर्ण प्रकरण पोलिस प्रशासनासमोर मांडले. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी, संबंधितांच्या जबाबांची नोंद, आर्थिक व्यवहारांची तपासणी तसेच फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
पोलिस आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर तपास यंत्रणा सक्रिय झाली असून आर्थिक व्यवहार, करारपत्रे, ई-मेल संवाद आणि अन्य पुराव्यांची पडताळणी सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून नाव समोर आलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ओंकार तुपे यांनी सांगितले की, सुमारे 700 ते 800 बेरोजगार तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सवलत मिळू नये. फसवणूक झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय आणि त्यांचे पैसे परत मिळावेत यासाठी आपण शेवटपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणामुळे आयटी क्षेत्रातील भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर यंत्रणा उभारण्याची मागणी होत आहे.











