पिंपरी-चिंचवड : शहरातील विद्यार्थ्यांमध्ये नागरिक शिस्त, सामाजिक जबाबदारी आणि सार्वजनिक मूल्यांची जाणीव निर्माण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळांमध्ये दर आठवड्याला “सिव्हिक सेन्स” (Civic Sense) विषयावर विशेष सक्तीचा तास सुरू करण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे यांनी महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
देशभरात स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारीबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात असले तरी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, रस्त्यावर थुंकणे आणि ध्वनीप्रदूषण करणे यांसारख्या समस्या अद्यापही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच नागरिक शिस्त आणि सामाजिक मूल्यांची जाणीव रुजविणे आवश्यक असल्याचे कलाटे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
शाळांमध्ये ‘सिव्हिक सेन्स’ विषयावर नियमित तास घेतल्यास विद्यार्थ्यांमध्ये सार्वजनिक स्वच्छता, वाहतूक नियमांचे पालन, पर्यावरण संरक्षण, सामाजिक शिस्त, सार्वजनिक संपत्तीचे जतन आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना विकसित होण्यास मदत होईल. आजचे विद्यार्थी हेच उद्याचे जबाबदार नागरिक असल्याने भविष्यात अधिक सजग, शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत समाज घडविण्यास या उपक्रमाचा फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या मागणीवर सकारात्मक निर्णय घेऊन शिक्षण विभागाला आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात, अशी विनंती स्नेहा कलाटे यांनी आयुक्तांकडे केली आहे.











