पुनावळे, दि. ९ जून २६-पुनावळे येथील माध्यमिक शाळेसाठी आरक्षित असलेली महापालिकेची जागा खासगी संस्थेला ३० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रस्तावाला नगरसेविका रेश्मा चेतन भुजबळ यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. याबाबत त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन देऊन सदर प्रक्रिया तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, मौजे पुनावळे येथील सर्व्हे क्रमांक ३८/४४ मधील आरक्षण क्रमांक ४/५७ अंतर्गत माध्यमिक शाळेसाठी राखीव असलेल्या जागेसाठी एका खासगी संस्थेने ३० वर्षांच्या भाडेकरारासाठी अर्ज केला आहे. मात्र, ही जागा शिक्षणासाठी आरक्षित असल्याने ती सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठीच वापरणे आवश्यक असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले आहे.
पुनावळे परिसर हा वेगाने विकसित होणारा निवासी भाग असून, येथील नागरिकांकडून उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधांची मागणी सातत्याने होत आहे. विशेषतः महापालिकेच्या सीबीएसई पद्धतीच्या शाळेची गरज मोठ्या प्रमाणावर व्यक्त केली जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सध्या परिसरातील उपलब्ध प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे अपुऱ्या पडत असून, पुनावळे भागात महापालिकेची माध्यमिक शाळा उपलब्ध नाही. त्यामुळे आरक्षित जागा खासगी संस्थेला देण्याऐवजी त्याच ठिकाणी महापालिकेमार्फत आधुनिक, सुसज्ज आणि दर्जेदार सीबीएसई शाळा सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित भाडे प्रक्रिया किंवा करार तात्काळ रद्द करून सदर जागेवर महापालिकेची शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती नगरसेविका रेश्मा भुजबळ यांनी प्रशासनाकडे केली आहे.
#reshmabhujbal #punavale #pimprichinchwadmunicipalcorporation #corporatorreshmabhujbal #pcmc












