पिंपरी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आरोग्य, जीवन व अपघाती विमा योजना तातडीने लागू करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका सौ. श्रुती राम वाकडकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे १०५ शाळांमध्ये ६० हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यापैकी बहुतांश विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल, कामगार आणि कष्टकरी कुटुंबांतील आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांच्या अपघात, गंभीर दुखापत, अन्न विषबाधा तसेच दुर्दैवी मृत्यूच्या घटना घडल्याने संबंधित कुटुंबांवर आर्थिक आणि मानसिक ताण निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना तात्काळ उपचार आणि आर्थिक मदत मिळावी यासाठी विमा संरक्षण गरजेचे असल्याचे वाकडकर यांनी म्हटले आहे.
निवेदनात महापालिका शाळांतील सर्व विद्यार्थ्यांसाठी आरोग्य, जीवन आणि अपघाती विमा योजना लागू करणे, अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना महापालिका रुग्णालयात मोफत उपचार देणे, गरजेनुसार मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचार सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच अपघात किंवा मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंबांना आर्थिक सहाय्य देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या योजनेसाठी महापालिका निधी, CSR निधी किंवा शासन योजनांमधून तरतूद करण्याची सूचना देखील करण्यात आली आहे. सुमारे २ कोटी ४० लाख रुपयांच्या वार्षिक खर्चातून ६० हजार विद्यार्थ्यांना विमा संरक्षण मिळू शकते. अल्प खर्चात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ही योजना प्रभावी आणि जनकल्याणकारी ठरू शकते, असे नगरसेविका श्रुती वाकडकर यांनी सांगितले.











